पालक आणि शिक्षक यांना ए डी एच डी या कॉमन मानसिक आजाराबद्दल काय माहिती असायला हवी ?
लहान मुलांच्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा काळ मुले ज्या दोन प्रकारच्या लोकांसोबत जगत असतात ती म्हणजे पालक आणि शिक्षक. त्यामुळे मुलांना होणारा /असणारा सर्वात कॉमन मानसिक आजार आपल्याला माहीत असायला हवा. हा आजार समजून घेणे फार जास्त अवघड देखील नाही. तो म्हणजे ए डी एच डी. अटेंशन डेफिसिट आणि हायपर एक्तिविटी डिसऑर्डर म्हणजे लक्ष न लागणे व अति चंचलतेचा आजार.
हा आजार समजून घेण्यासाठी आधी लक्ष देणं अथवा लक्ष केंद्रित करणे म्हणजे काय हे आपण लक्षात घ्यायला हवं. माणसाच्या जीवनात सतत चालत राहणारी मानसिक क्रिया म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष देणे. अगदी खाता पिताना पासून ते खेळण्या पर्यंत आपल्याला एखादया कृतीवर, गोष्टीवर लक्ष द्यावे लागते. जसे की हा लेख वाचताना तुम्ही फक्त मोबाईल किंवा लॅपटॉप च्या स्क्रीन मध्ये लक्ष देऊन आहात. या वेळेला आजूबाजूला सुरू असणाऱ्या अनेक गोष्टींवरचे लक्ष हटवून तुम्ही फक्त वाचनावर लक्ष केंद्रित करत आहात.या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेमुळे आपण साधारणतः अर्धा एक तास ते काही वेळेस चक्क दोन दोन तास वगैरे एकच काम करत त्या कामात तल्लीन होऊन कामाची मजा घेतो.
अनेक बौद्धिक कामे आपण या कौशल्यामुळे एका दमात करतो.
असे रोजच आपण जे काही काम करतो त्या कामावर लक्ष केंद्रित करत असतो. लक्ष केंद्रित केल्याच्या स्थितीत आपल्याला बराच काळ राहावे लागते. आणि आपण ते करू शकतो त्यामुळेच आपण बराच काळ एकच एक काम करून त्या कामात प्राविण्य मिळवतो. उदाहणादाखल आपण कुंभार, लोहार या पासून ते इंजिनियर ते डॉक्टर चे उदाहरण विचार करुन पहा. एखादया गोष्टीवर लक्ष केंद्रित करावेच लागते. त्याला पर्याय नाही.
लहान मुलाची कामे:-
लहान मुलांना आपण कोणती कामे देतो ? असे म्हणू, की त्यांचे मुख्य काम शिकणे, खेळणे, अभ्यास हे असते. या मुख्य कामांमध्ये मूल लक्ष देऊ शकत नाही केंद्रीत करू शकत नाही लक्ष हटते तेव्हा त्या मुलालासमाजाकडून अनेक बोल लावले जातात. तो एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करत नाही हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा दोष आहे असा गैरसमज पालक व शिक्षक यांना वाटत राहते. असे विद्यार्थी पटकन ऐकत नाहीत तेव्हा अशा विद्यार्थ्याला शिस्त लावण्यासाठी काही वेळेस शिक्षा केली जाते तर काही प्रसंगी पालक सर्रास जोर जबरदस्तीने, मारहाण करून मुलाला अभ्यासाला बसवतात किंवा एखादी गोष्ट शिकवण्यासाठी बसवतात.
ज्या मुलाला एडीएचडी हा आजार असेल तर त्या मुलाच्या बाबत मोठ्या प्रमाणात ही शक्यता आहे की मूल एका जागी स्थिर बसू शकत नाही. आणी एका कृतीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत असल्यामुळे त्याला आजूबाजूचे आवाज अधिक ऐकू येतात. मन अतिचंचल असल्याने त्याचे लक्ष आजूबाजूच्या घटनांकडे जाते. पालकांनी समोर दिलेले काम करण्याचे भान या मुलांना राहत नाही.
नेमके हेच आजाराचे मुख्य लक्षण आहे. लक्ष केंद्रित करणे ही आपल्याला सहज जमणारी गोष्ट त्यामुळे इतर व्यक्ती हे करू शकत नाही याचे आपल्याला नवल वाटते. परंतु काही लोकांना हे खरंच जमत नाही याचे कारण मानसिक आजारात दडलेले आहे. अति चंचलतेमुळे आणि लक्ष न लागण्याच्या स्थितीमुळे मूल सातत्याने शालेय कौशल्य मिळवण्यात मागे पडत जाते. 50% वेळा अभ्यासातून लक्ष उडून जात असेल तर मग ते मूल स्वतःच्या क्षमतेच्या 50 टक्केच कौशल्य मिळवेल. साहजिक आहे की हे मूल अभ्यास , खेळ व ईतर कौशल्यात इतर मुलांच्या मागे पडेल.
सामान्यतः मुले अभ्यास करत नाहीत तेव्हा आपण रागावल्यास मुले अभ्यासास बसतात. ए डी एच डी आजारातल्या मुलांना मात्र लक्ष केंद्रित करण्यास फार अवघड जाते. त्यामुळे अभ्यास प्रचंड नावडीचा होत जातो. व त्यामुळे आत्मविश्वास कमी होत जातो. आपलयाला अभ्यास येत नाही याचे शल्य मुलांत मोठया प्रमाणात तयार होते. अपराधी भावना अनेकदा मनात तयार होते.
पालकांशी अथवा शिक्षकांशी संवाद करताना अनेकदा अशा मुलांचे लक्ष नसते. मूल आपल्याकडे लक्ष देत नाही म्हणून पालक, शिक्षक चिडतात. एखादे मुल शिक्षकांच्या व पालकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, शिक्षक अथवा पालकांचे ऐकत नाही याचे कारण एडीएचडी आजारपणामध्ये सापडण्याची शक्यता खूपच मोठी आहे.
त्यामुळे आपण मुलांची काळजी घेत असताना हे निरीक्षण करायला हवे की, मुलांना लक्ष केंद्रित करण्यास त्रास होतो आहे का आणि जर होत असेल तर त्यांना ए डी एच डी आजार तर नाही ना हे तपासून घ्यायला हवे.
एडीएचडी ची मुख्य लक्षणे खालील प्रमाणे आहेत.
लक्ष केंद्रित करण्यास अडचण येते.
अतिचंचलतेमुळे एका जागेवर स्थिर बसण्यास अडचण येते.
आवेगात येऊन एखादी कृती केली जाते.
या आजाराचे कारण बरेच जटील आहे. ए डी एच डी या आजारात असे आढळून येते की मेंदूमध्ये विशिष्ट भागात दोन पेशींमध्ये असणाऱ्या पोकळीत नोरेपिनेफ्रिन या रसायनाची मात्रा कमी पडते. ही मात्रा औषध देऊन वाढवता येते. आणि औषधांचा उपयोग फार चांगल्या परिणाम कऱण्यात दिसून येतो. या आजारावर उपचार उपलब्ध आहेत.
उपचाराने मुलांचे वर्तन सुधारते आणि लक्ष केंद्रित करण्यात येणारी अडचण मोठ्या प्रमाणात कमी होते. सहाजिकच अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला लागल्यामुळे मुलांचा शाळेतला परफॉर्मन्स सुधारतो. मुले घरात लक्ष देऊ शकत असल्यामुळे पालकांनी सांगितलेल्या गोष्टी ऐकतात आणि त्यामुळे पालकांसोबतचे त्यांचे नाते सुधारते.
ए डी एच डी असणाऱ्या मुलांमध्ये दिसणाऱ्या समस्या नेमके पणाने समजून घेऊन उपचार केल्यास विद्यार्थ्यांचा आणि पर्यायाने पालकांचा बराच फायदा होतो. मुलाचे शिक्षण सुधारल्याने व त्याचे नातेसंबंध सुधारल्याने त्या मुलाच्या जीवनात लक्षणीय फरक पडतो. तुमच्या आजूबाजूला असे विद्यार्थी असल्यास त्यांच्या पालकांपर्यंत व शिक्षकांपर्यंत ए डी एच डी या कॉमन मानसिक आजाराबद्दल माहिती पोहोचवा.
पालक आणि आणि शिक्षकानी मुलांचा असा मानसिक आजार वेळीच ओळखायला हवा आणि मनोविकार तज्ञांकडून उपचार देखील घ्यायला हवेत. सोबतच समुपदेशन म्हणजे संवाद थेरपी घ्यावी. म्हणजे दुहेरी फायदा होतो.
ए डी एच डी हा मानसिक आजार वेळीच ओळखा. उपचार घ्या आणि मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा घडवून आणा.
धन्यवाद.
Yogesh Phadtare
Psychologist and Psychotherapist
M.A.(Clinical Psychology)
अतिशय सोप्या भाषेत खूप महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे .परंतु काही मुले ही फक्त अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकत नाहीत आणि इतर गोष्टीत करू शकतात पण इतर लक्षणे जसे की अतीचांचलता ,अती आवेग असे असेल तर त्याला या आजारात गणता येईल का?
उत्तर द्याहटवाउत्तम मांडणी आहे.
उत्तर द्याहटवाउत्तम माहिती. मुलांना लहान वयातच एडीएचडी चे निदान होण्यासाठी खूप फायदा होईल. व तसे थेरपी व उपाय लवकरात लवकर ते घेतील.
उत्तर द्याहटवा