लग्न करण्यापूर्वी भावनिक अनुकूलता ओळखा.
लग्न हे फक्त दोन व्यक्तींचे नाही तर दोन जीवनप्रवाहांचे एकत्र येणे असते. भारतीय समाजात तर ते अनेकदा दोन कुटुंबांचे एकत्र येणे असते. रूप, शिक्षण, नोकरी, आर्थिक स्थिती या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण त्यासोबत दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याचा पाया भावनिक अनुकूलतेवर उभा असायला हवा. अनेक जोडपी लग्नानंतर "आमचे विचार जुळत नाहीत" किंवा "आम्ही एकमेकांना समजू शकत नाही" अशी तक्रार करतात. त्यामुळे लग्नापूर्वी भावनिक अनुकूलता तपासणे आवश्यक आहे.
१. संवादाची पद्धत कशी आहे?
तुम्ही दोघे मतभेद असताना शांतपणे बोलू शकता का? की लगेच राग, अबोला किंवा टोमणे सुरू होतात? चांगल्या नात्याचे लक्षण म्हणजे समस्या टाळणे नव्हे, तर त्यावर चर्चा करून मार्ग काढणे. भल्या भल्या अत्यंत हुशार कर्तबगार लोकांना शांतपणे संवाद साधने जमत नाही. शांतपणे संवाद साधणे हे चांगल्या भावनिक बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. संवादाची पद्धत मुख्यतः आदळआपट न करता राग व्यक्त करणे हे दोन्ही जोडीदारांना जमायला हवे.
२. भावना व्यक्त करण्याची क्षमता
समोरची व्यक्ती दुःख, राग, भीती किंवा आनंद याबद्दल मोकळेपणाने बोलते का? भावनिकदृष्ट्या परिपक्व व्यक्ती स्वतःच्या भावना ओळखते आणि त्या योग्य पद्धतीने व्यक्त करू शकते. स्वतःच्या भावना ओळखणे आणि त्या शांतपणे इतरांपर्यंत पोहोचवणे हा भावनिक बुद्धिमत्तेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
३. सहानुभूती आहे का?
तुमच्या अडचणी ऐकून घेण्याची, तुमच्या दृष्टिकोनातून परिस्थिती समजून घेण्याची तुमच्या जोडीदाराची तयारी आहे का? ती तशी असायला हवी. सहानुभूती नसल्यास नाते व्यवहारापुरते मर्यादित राहू शकते. सहानुभूती असणे माणूसपणाचे महत्त्वाचे लक्षण आहे.
४. मतभेद हाताळण्याची शैली
प्रत्येक जोडप्यात मतभेद होतात. परंतु मतभेद झाल्यावर व्यक्ती अपमान करते, दोष देते की समजून घेण्याचा प्रयत्न करते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. स्वतःचे भावनिक नियमन करून स्वतःच्या रागासारख्या भावनांना योग्य पद्धतीने चॅनल करणे आवश्यक आहे. मनात खूप प्रेम आहे पण मतभेद झाल्यास समोरच्याचा धाडकन अपमान करतात अशा व्यक्ती सोबत राहणे अवघड असते.
५. जीवनमूल्ये कितपत जुळतात?
कुटुंब, करिअर, मुलांचे संगोपन, पैशांचे व्यवस्थापन, धार्मिक किंवा सामाजिक मूल्ये याबद्दल दोघांचे विचार खूप भिन्न असतील तर भविष्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो.
६. एकमेकांच्या मर्यादांचा आदर
समोरची व्यक्ती तुमच्या वैयक्तिक जागेचा, आवडी-निवडींचा आणि स्वातंत्र्याचा आदर करते का? प्रेम म्हणजे नियंत्रण नव्हे, तर आदर.
७. कठीण प्रसंगातील वर्तन
आनंदाच्या क्षणी सर्वजण चांगले वागतात. पण तणाव, अपयश किंवा संकटाच्या काळात व्यक्ती कशी वागते, यावर तिची भावनिक परिपक्वता अधिक स्पष्ट होते.
निष्कर्ष
भावनिक अनुकूलता म्हणजे प्रत्येक गोष्टीत एकमत असणे नाही. ती म्हणजे मतभेद असूनही एकमेकांचा आदर राखणे, संवाद साधणे आणि नाते जपण्याची तयारी असणे. लग्नापूर्वी काही कठीण विषयांवर प्रामाणिक चर्चा करा. योग्य जोडीदार तो नसतो जो तुमच्यासारखाच असतो, तर तो असतो जो तुमच्यासोबत वाढण्यास आणि बदल स्वीकारण्यास तयार असतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा