▼

किशोरवयीन मुलांशी कसे वागावे ?


किशोरवयीन मुलांशी कसे वागावे?

किशोरवय हा बदलांचा काळ आहे. या वयात मुलांमध्ये शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल झपाट्याने घडतात. या बदलांमुळे ते कधी गोंधळलेले, कधी हट्टी, तर कधी अत्यंत संवेदनशील दिसतात. पालक, शिक्षक आणि समाजाने या काळात त्यांच्याशी योग्य पद्धतीने वागणे महत्त्वाचे असते.

१. मार्गदर्शक (Mentor) व्हा, केवळ नियंत्रक नाही

David Yeager यांच्या "Mentor Mindset" नुसार किशोरवयीन मुलांना फक्त काय करावे हे सांगणे पुरेसे नसते. त्यांना हे पटवून द्यायला हवे की आपण त्यांच्या पाठीशी आहोत, त्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करतोय.
👉 उदाहरण : “तू अभ्यास कर, नाहीतर निकाल वाईट येईल” असे म्हणण्याऐवजी “मला माहित आहे तुझ्यासाठी अभ्यास अवघड वाटतो, पण मी तुझ्यासोबत बसून तुला अभ्यासात मदत करू शकतो” असे म्हणणे अधिक परिणामकारक ठरते.

२. त्यांना ऐकून घ्या

किशोरवयीन मुलांना वाटते की पालक, शिक्षक कोणीच त्यांना समजून घेत नाही. अशा वेळी त्यांच्या भावना, शंका किंवा समस्या शांतपणे ऐकून घेणे महत्त्वाचे आहे.
👉 त्यांचे पूर्ण बोलणे शांतपणे मध्ये काहीच न बोलता ऐका, मगच योग्य सल्ला द्या. सल्ला न मागिल्यास नका देऊ. 

३. आदर आणि विश्वास आवश्यक 

या वयातील मुलांना स्वातंत्र्य गरजेचे वाटत असते. जर आपण त्यांच्यावर सतत संशय घेतला, तर ते आपल्यापासून सहज दुरावू शकतात. त्यांना लहान सहान निर्णय घेण्याची जबाबदारी द्या.
👉 उदाहरण : स्वतःचे कपडे निवडणे, छोट्या खरेदीसाठी जाणे. वेळेच्या मर्यादेत मित्र मैत्रिणी सोबत फिरायला जाणे. 

४. चुका करण्याची मुभा द्या

किशोरवयीन मुले चुका करतात, पण त्या चुका ही त्यांची शिकण्याची संधी असते. मानसशास्त्रानुसार, जर त्यांना प्रत्येक वेळी ओरडले गेले तर त्यांची आत्मविश्वास कमी होतो. म्हणून चुका समजावून देताना संयम ठेवावा. 

५. प्रेरणा द्या, दबाव नाही

Mentor mindset म्हणतो – मुलांना purpose दाखवा. त्यांना हे समजावून सांगा की त्यांचा प्रयत्न फक्त गुणांसाठी नाही, तर त्यांच्या आयुष्याच्या मोठ्या उद्दिष्टांसाठी आहे.
👉 “तू डॉक्टर होण्यासाठी अभ्यास करतो आहेस, म्हणजे पुढे रुग्णांना मदत करू शकशील” – असे वाक्य त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा आणते.

६. संवाद साधावा, भाषण देऊन उपयोग नाही

किशोरवयीन मुलांना सतत उपदेश नको असतो. त्यांना संवाद हवा असतो.
👉 पालकांनी प्रश्न विचारून त्यांचे विचार जाणून घ्यावेत. “तुला काय वाटते?”, “तू कसा विचार करतोस?” अशा वाक्यांचा वापर करावा.


निष्कर्ष

किशोरवयीन मुलांशी वागणे म्हणजे एक संवेदनशील कला आहे. जर आपण नियंत्रक न बनता मार्गदर्शक (mentor) झालो, तर त्यांना स्वतः बद्दल विश्वास वाटू लागतो आणि ते सकारात्मकतेने विचार करतात. मुलांचे पूर्ण बोलणे ऐकणे, त्यांना पुरेसा आदर देणे आणि प्रेरणा देणे ही या वयात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा